ambedkar · buddha

बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत

खालील लेख हा निबंध म्हणुन राज्यस्तरीय स्पर्धैत निवडला गेला आहे….

“बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत”

विशाल जाधव

Dr. Bhimrao Ambedkar

इतिहासाच्या पानावर अक्षरश हजारोंनी गर्दी केली आहे.पण गर्दीत एक नाव सुर्यासारखं ‘स्वयंप्रकाशित’ होउन सर्वांना जगण्याचा प्रकाश देत आहे ते नाव म्हणजे वैश्विक ञानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय’.डॉ.बाबासाहेब आज विश्वाचे मार्गदर्शक आणि प्रेरणा बनले आहेत.त्या डॉ.बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताविषयी केलेलं एक विश्लेषण…….

हजारो जाती,पोटजाती,उपजाती , जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म,विविध पंथ,भाषा,संस्कृती,असलेला भारत देश म्हणजे ‘आठशे खिडक्या आणि नउशे दारं’ …!
म्हणुन विन्सटन चर्चिलने असं भाकित केलं होतं की भारत हा देश एक राष्ट्र म्हणुन उभा राहुच शकत नाही..तो एकसंघ होउच शकत नाही.!अर्थात कोणीही परिस्थिती मान्यच केली असती आणि चर्चिलचं मत योग्यच समजलं असतं.पण आज आपण पाहत आहोत की ‘डॉ.बाबासाहेबांनी’ आणि त्यांच्या ‘संविधानाने’ चर्चिलचं भाकित पुर्णपणे खोटं ठरवलं आहे..!
एवढी ताकद आहे त्यांच्या विचारामध्ये आणि भारतीय संविधानामध्ये.पण आणखी थोडं पुढे जाउन विचार करतांना खरोखरंच त्यांच्या स्वप्नातला भारत आज दिसत आहे का? लोकशाही लोकशाही आहे का?

लोकशाहीची व्याख्या By the people,of the people,for the people ही आहे पण विचार केला तर ‘Buy’the people(लोकांना विकत घेणारी)’Off’ the people( लोकांचा विचार न करणारी),’Far’ the people (लोकांपासुन दुर गेलेली)अशी व्याख्या आजच्या परिस्थितीकडे बघुन दिसते.निवडणुकीमध्ये मत पेशांने विकत घेतले जातात.आणि सत्तेत आल्यावर लोकांचा विचार केला जात नाही आणि अर्थातच लोकांना वाटते लोकशाही  आपल्यापासुन दुर गेली आहे.

आजकाल भारतामध्ये धर्माधता वाढत चालली आहे.मुळात भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना असं होत आहे.आणि त्यांचेच जर शासन असेल तर त्यांना आवरणे खुपच कठिण बनुन जाते.त्यांना वाटते “संय्या भये कोतवाल अब डर काहे का” ..! म्हणुन जे मनात येईल ते करतांना ते दिसत आहेत.आणि राष्ट्रवादांचा तर अक्षरश सुळसुळाटच यांनी मांडला आहे.”हम कहे वो देशभक्ती” प्रमाणे यांच वर्तन दिसत आहे.याच्याकडे बघुन वाटते की “राष्ट्रद्रोही आज राष्ट्रवादी बनले..!’भारत हा कोणामुळे भारत आहे तर तो संविधानामुळे आहे.या भारताचा ‘पाकिस्तान’ झाला नाही याचं श्रेय बाबासाहेबांना जाते.मग पुन्हा आज ‘हिंदुचा पाकिस्तान’ निर्माण करत आहेत का? भारत आणि पाकिस्तान दोन्ही एकासोबत स्वतंत्र्य झाले.पण आज पाकिस्तानची स्थिती काय आहे? धर्माचा पुर्ण थैमान आहे.कोणताही देश हा धर्मावर कधीच उभा राहु शकत नाही नाहीतर त्याचा ‘पाकिस्तान’ झाल्याशिवाय राहणार नाही.तो उभा राहतो लोकांच्या मुलभुत हक्कावर त्याच्या कल्याणावर .डॉ.बाबासाहेबांनी एक वाक्य खुपच जबरदस्त आहे आणि आजही ते आधुनिक आहे.’ माणुस धर्माकरीता नाही तर धर्म हा माणसाकरीता आहे.’कोणताही धर्म माणसापेक्षा श्रेष्ठ नाही.कारण तो ‘माणसाने माणसाठी’ निर्माण केला असतो.

मुळात घटनेमुळेच पक्ष, शासन बनते पण पक्ष घटना मानतात का? डॉ.बाबासाहेबानी 25 नोव्हेंबर 1949 ला इशारा दिला होता की “येथले लोक पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील की देशाला? जर ते देशापेक्षा पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचं नष्ट होईल.!”हा भयसुचक संदेशाकडे आपण आज दुर्लक्ष करत चाललो आहोत असं वाटते आणि याविषयी लोकांनी विचार नाही केला तर याचे परिणाम भयंकर होतील.असे म्हणतात की “भुल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभुल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही” हे काही खोटं नाही.भारतामध्ये हे होतांना दिसत आहे.जनतेची निव्वड दिशाभुल आज सरकार करत आहे ते कोणाचेही असो.

कोणत्याही देशामध्ये व्यक्तीस्वातंत्र्य खुप महत्वाची असते आणि त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य खुपच.पण देशात विद्यार्थीसहीत लोकांना आवाज दाबला जातोय का?लोकांना त्यांचे विचार मांडण्यावर बंधन येत आहेत का?संध्या देशात जे वातावरण आहे यावर लोक का व्यक्त होत नाहीत?(अर्थात कोणी त्यावर व्यक्त होउ नये अशी आज परिस्थिती आहे ती गोष्ट वेगळी.!)प्रत्येकीला तो संवैधानिक अधिकार आहे.आणि डॉ.बाबासाहेबांच्या मते ” एखादं शासन टिकण्यापेक्षा लोकांचे अधिकार टिकणे खुप जास्त जरुरीचे असते”.

भारताच्या तरुणांविषयी डॉ.बाबासाहेबांना खुप अपेंक्षा आहेत.पण आज आपल्या तरुणांची मानसिकता काय आहे? ” मी ,माझी पत्नी,बाला ,बाली अन दहा बाय दहाची खोली “.अशी मानसिकता दिसत आहे.स्वार्थीपणा वाढतांना आज दिसत आहे.सर्वकडे माणुस दिसत आहेत पण माणुसकी दिसत नाही आहे.विद्यार्थांनी स्वतबरोबरच आपल्या देशाचाही विचार करायला हवा.तरुणांना त्याच्या सामर्थ्याची जाणिव व्हायला हवी.तरुण म्हणजे कोण? “जो चट्टानो से टकराते है उसे तुफान कहते है लेकीन जो तुफानोसे टकराते है उसे युवा कहते है..!”आणि ज्या देशातले तरुण हे ञानी,शीलवान ,संवेदनशील असतील तो देश कधीच मागे पडणार नाही.

प्रत्येकाने नेहमी लढले पाहीजे.संघर्ष केला पाहीजे.त्यामुळेच व्यक्ती बलवान बनते.प्रसिद्ध विचारवंत डार्विन म्हणतो की ” बलवानास जगण्याचा अधिकार आहे.जिवनाच्या दिर्घ संघर्षमय प्रवासात जो जिव सातत्याने संघर्ष करतो तोच भविष्यकाळासाठी निवडला जातो.त्याचे अस्तित्व दिर्घ काळ टिकते.” म्हणुन आपण सातत्याने संघर्ष केला पाहीजे.अन्यायाविरोधात आता लढले पाहीजे.

डॉ.बाबासाहेब समाजपरिवर्तनासाठी तरुणांना पुढे येण्यास सांगतात.ते म्हणतात की “तरुणांनी समाजासाठी संघर्ष केला पाहीजे.त्यामुळे समाजाचं जे भलं होईल त्याचे हकदार हे तरुण राहतील पण त्यांनी जर समाजासाठी काही केलं नाही,समाजासाठी लढले नाही तर मग समाजाची जी परिस्थिती होईल त्यालासुद्धा तरुणच जबाबदार असतील”.

डॉ.बाबासाहेबांना स्त्रियांविषयी खुप आपुलकी होती आणि त्यांच्या परिस्थितीविषयी जाण होती.म्हणुन ते म्हणतात की ‘I Measure the progress of the community by the degree of progress which woman have achieved'(मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रीयांच्या झालेल्या प्रगतीवरुन मोजतो.)इतका आधुनिक  वैश्विक विचारवंत स्त्रियांविषयी पुर्ण जगात नाही.म्हणुन बराक ओबामा म्हणतात की “डॉ.आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सुर्य संबोधले असते.”

डॉ.बाबासाहेबांना असा भारच अपेंक्षित आहे की जेथे तथागत बुद्धांचे विचार असतील.बुद्धांचे विचार जे की समता,स्वातंत्र्य,बंधुत्व आहेत जे की आपल्या संविधाचा गाभा आहे ते प्रत्येक भारतीयांच्या आचरणात त्यांना पाहीजे आहे.म्हणुनच त्यासाठी त्यांनी म्हटले आहे की ‘मी संपुर्ण भारत बौद्धमय करीन” आज आपण पाहतो की जर कोणाला विचारले तर तु कोन तो सांगतो अमुक जातीचा तमुक धर्माचा,वगैरे वगैरे.पण डॉ.बाबासाहेब म्हणतात की I am first Indian And Indian at the end And Nothing In between..!हा विचार आपण स्विकारला पाहीजे.आपण प्रथमता भारतीय आहोत अंतिमता भारतीय आहोत आणि याशिवाय काहीच नाही आहोत.म्हणुनच डॉ.बाबासाहेबांनी संविधानाच्या उद्देशिकेत/प्रस्तावनेत “आम्ही भारताचे लोक”  असे लिहले आहे.एखाद्या धर्माचे किंवा जातीचे नाही.आणि संविधानाला स्वत:प्रत अर्पण केले आहे इतर कोणालाही नाही. आपण भाषावाद,प्रांतवाद,जातीवाद,
यासारख्या वादांना आपण जमिनीत गाढुन टाकले  पाहीजेत.आपण एक असा भारत निर्माण करायला हवा जो फक्त एकच साक्ष देइन तो म्हणजे माणुसकीची.

आज”भारतामध्ये जग” दिसत आहे पण “जगामध्ये भारत” दिसत नाही आहे.महासत्ता व्हायचं जे स्वप्न आपण पाहीलं आहे ते आपल्यालाच तर पुर्ण करायचं आहे.डॉ.बाबासाहेबांनी सांगितलं आहे की” जेव्हा देवळात जाणार्या रांगा ग्रंथालयात जातील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..!” आणि ते पुढे असेही म्हणतात की
“पुस्तकाने माणसाचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेलं मस्तक कोणाचही हस्तक होत नाही आणि हस्तक न झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही”.याचा आपण विचार जरुर करायला हवा.एकविसाव्या शतकात आपण आज आहोत.जुन्या जाचक रुढी परंपरा घेउन बसणं म्हणजे गाढवावर बसुन जग भ्रमण करण्याचं ठरवणं होय. .आपण इहवाद स्विकारला पाहीजे.डॉ.बाबासाहेबांना एका ख्रिश्चन धर्मगुरुने पत्र लिहुन पाठवलं होतं की “तुम्ही आमचा धर्म स्विकारा येशु तुम्हाला स्वर्गात मुक्ती मिळवुन देइल “. तेव्हा डॉ.बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिले की ” तुम्हाला कोणत्या गाढवाने सांगितलं की मला स्वर्गातली मुक्ती हवी मला माझ्या समाजाची इहलोकातली मुक्ती हवी आहे.” असा इहवाद आपण सर्वांनी स्विकारायला हवा.

‘डॉ.बाबासाहेब हा बोलण्याचा विषय नसुन तो आचरणाचा विषय आहे’.म्हणुन त्यांचे विचार आपण स्विकारुन प्रत्यक्ष आचरणात आणले पाहीजेत.आणि कोणताही देश म्हणजे एखाद्या जमिनीचा तुकडा नसुन तर लोकांची एकात्मता आणि माणसाच्या माणुसकीचे अस्तित्व होय.it is an easy to give an example but it is difficult to become an example…अमेरिका,रशिया महासत्तेचे आपण उदाहरण देतो पण स्वतच्या महासत्तेचे उदाहरण बनले आहोत का? याचा विचार आपण करायला हवा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्या देशातला शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहीजे आहे,त्यांचा विद्यार्थी हा भारतासाठी जगणारा पाहीजे आहे,भारतातले लोक त्यांना विञानवादी पाहीजे आहेत,भारतामध्ये समता स्वातंत्र्य,बंधुत्व,आणि सामाजिक न्याय त्यांना पाहीजे आहे,स्त्रियांचा संन्मान त्यांना लोकांनी केलेला हवा आहे,त्यांना जातीवाद नको आहे सर्व मानव जन्मताह: समान आहेत ,देश त्यांना महासत्ता हवा आहे लोकशाही आज जी ठोकशाही सामान्यांना वाटते ती “लोकांनी चालवण्यापेंक्षा ती लोकांसाठी चालवली जात आहे”  असा विश्वास लोकांमध्ये हवा आहे.

डॉ.बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्याच ” लोकांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय जिवनात क्रांतिकारक बदल घडवुन आणणारी शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही होय” अशी आहे.म्हणजे लोकांच्या पुर्णत जिवनात परिवर्तनकारी बदल घडणे हेच बाबासाहेबांच्या लोकशाहीचे ध्येय आहे .आणि आपण ते पुर्ण करायला हवे.आणि डॉ.बाबासाहेब असेही म्हणतात की “एखादा माणुस कितीही मोठा असला तर त्याच्या चरणी आपण आपले व्यक्तीस्वातंत्र्याची सुमणे उधडु नये.!”आणि पुढे ते असेही म्हणतात की ” स्वाभिमानाचा बळी देउन कोणताही माणुस कृतञता व्यक्त करु शकत नाही,शीलाचा बळी देउन कोणतीही स्त्री कृतञ राहु शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देउन  कोणतेही राष्ट्र कृतञता व्यक्त करु शकत नाही..” हा जो भयसुचक संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो वेळोवेळी आपणा सर्वांना दिशादर्शक आहे.याचा आपण सदोदित विचार करायला हवा आणि त्यांनी असेही म्हटवे आहे की ” आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा बिंदु असेपर्यत आपण आपल्या मायभुमिच्या स्वातंत्र्याचे रक्षण करायला हवे”.
खरी देशभक्ती राष्ट्रीयत्व काय? “एखाद्या भारतीय व्यक्तीला परदेशात काही झाल्यास ‘संपुर्ण देश’ पेटुन उठला पाहीजे फक्त त्याच्या धर्माचे किंवा जातीचे नव्हे..!”हेच खर्या एका राष्ट्राचे लक्षण आहे.त्यातच त्याचे रक्षण आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या मताधिकाराचा(मतदान नव्हे!)वापर विचारपुर्वक करायला हवा.मतदान या शब्दात ‘दान’ असल्यामुळे आणि दान दिल्यावर काही संबध राहत नाही तसच राजकीय नेत्यांना वाटते की दान केलं म्हणजे संपलं आणि त्याच्या मतासाठी लोक पैशेही स्विकारतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी अतिशय विचारपुर्वक संदेश दिला आहे.” तुमच्या मताची किंमत तुम्ही मिठ मिरची इतकी कमी समजु नका.ज्यादिवशी त्यातील सामार्थ तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेउ पाहणार्या व्यक्तीइतके कंगाल कोणी नसेल..!”हे खरोखरच खरं आहे.एका मतामध्ये इतकी शक्ती आहे की सत्तेला ती नियंत्रित करु शकते.म्हणुन डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा वापर करणे गरजेचे आहे आणि मताधिकार(Right of vote)हा केवळ डॉ.बाबासाहेबांमुळेच प्रत्येक भारतीयला मिळाला आहे.कित्येक देशामध्ये स्त्रियांना,गरीबांना,खालच्या जातीच्या लोकांना मताधिकार नव्हते आणि भारतासारख्या देशामध्ये डॉ.बाबासाहेबांनी ते इतक्या लवकर भारतीय संविधानाच्या माध्यमातुन दिले आहेत याविषयी प्रत्येक भारतीयांने बाबासाहेबांशी नेहमी कृतञ राहीले पाहीजे.

जातीवाद,दलितांवरील अत्याचारात वाढ होतांना दिसत आहे.एखाद्या व्यक्तीला  खालच्या जातीचा आहे म्हणुन असे अमानवी कृत्य करणे लाछनास्पद आहे.उत्तर प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो किंवा आणखी कोणते राज्य असो असे अन्याय अत्याचार रोज होत असतात पण ते माहीती होतातच असे नाही.डॉ.बाबासाहेबांनी म्हणुन सांगितले आहे की Castes are anti national (जाती या देशविघातक आहेत)म्हणुन डॉ.बाबासाहेबांनी annihilation of caste लिहुन जागाचे लक्ष वेधले.आणि जाती निर्मुलन करण्यासाठीच आणि माणसाला माणुस बनण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्म स्विकारला.आणि डॉ.बाबासाहेबांना विञानवादी धम्म पाहीजे होता.बुद्ध म्हणतात की “मी सांगतो आहे म्हणुन माझा धम्म स्विकारु नका तसेच कोणतीही गोष्ट एखादी मोठी व्यक्ती सांगत आहे किंवा ज्येष्ठ व्यक्ती सांगत आहे समाजात दिली मान आहे ती सांगत आहे म्हणुन ती गोष्ट स्विकारु नका तर ते बुद्धिच्या कसोटीवर घासुन बघा.ती तुम्हाला बुद्धिसंगत न्यायसंगत वाटत असली तरच स्विकारा अन्यथा सोडुन द्या.स्वतच्या धम्माविषयी जगात बुद्धाशिवाय कोणीही इतके विचारस्वातंत्र्य दिले नाही..!असाच विञानवाद डॉ.बाबासाहेबांना भारतीय लोकांमध्ये पाहीजे आहे .

आज चित्र पाहीले तर देशाचे दोन भाग दिसतात.एक भारत आणि दुसरा इंडिया..!भारत हा खेडेगावाला म्हणतात आणि इंडीया हे शहरी भागाला म्हणतात.आजही खेळेगावात अप्रगत आणि फक्त शहराचा विकास होत आहे.ही विषमता आपल्याला नष्ट करावी लागेल.शहराबरोबरच आपल्याला गावांचाही विकास करावा लागेल.”स्मार्ट सिटी” बरोबरच “स्मार्ट व्हीलेजही” व्हायला हवे.शेती आणि शेतकर्याविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाकित केले होते ते आजही लागु पडते किंबहुना त्याची गरज तेव्हापेक्षा जास्त आहे.डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की “भारतीय शेती ही आजारी पडली आहे.शेतीसाठी शासनीने पुढाकार घ्यायला हवा.शेतकर्याने शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण देउन उद्योगधंदा सुरु करायला सांगायला पाहीजे,नोकरी करायला पाहीजे आणि फक्त एकालाच शेतीत ठेवले पाहीजे.आणि  सर्वात महत्वाचं शेतीला आपण उद्योगाचा दर्जा दिला पाहीजे.त्याच्या उत्पादनाला आपण उद्योगाच्या उत्पादनाचा भाव द्यायला हवा.नाहीतर एक दिवस असा येइल की शेतकर्याला आत्महत्या करावे लागेल…!”
डॉ.बाबासाहेबांनी केलेलं भाकीत आज खरं होत आहे.शेतकरी आत्महत्या ही गंभीर समस्या बनली आहे.यासाठी तमाम शेतकर्यांनी आणि सरकारने डॉ.बाबासाहेबांनी जे विचार प्रदर्शित केले आहेत त्याचा अंगिकार करणे ही काळाची गरज झाली आहे.

“आभाळाला हात लावायचा असेल तर अगोदर स्वतची उंची वाढवली पाहीजे” त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल तर त्यांचे विचार आपण स्विकारले पाहीजेत आणि स्वप्नातला भारत स्वप्नातच नाही तर तो प्रत्यक्षात आपल्याला निर्माण करायला हवा.हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विन्रम अभिवादन असेल….!

-विशाल रामचंद्र जाधव

(वरील निबंधाने राज्यस्तरीय मुंबई विद्यापिठाच्या निबंध स्पर्धैत पारितोषिक मिळवले आहे.)

Advertisements